Maharashtra Rains | पालघर-ठाण्यात नद्यांना पूर, कोळसा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरणांची पाणी क्षमता पूर्ण झाली आहे. मध्य वैतरणा, मोडकसागर आणि धामणे धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मध्य वैतरणा धरणातून जवळपास अठ्ठावीस हजार क्यूसेक पाणी वैतरणा नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी, वैतरणा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. या नदीचे पाणी मनोर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिरले आहे. पालघर-मनोर रस्त्यावरील कोळसा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. सूर्या, तानसा, पिंजाळ या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.