Maharashtra Rain : पावसानं जोजावला कृष्णाचा पाळणा...राज्यातील अनेक भागात शेतकरी सुखावला
ऐन पावसाळ्यात पाऊस सुट्टीवर गेल्यामुळे, शेतकरी बांधव कातावून गेले होते. धरणांची पात्र उघडी पडली आणि विहिरींनीही तळ गाठला... पोट खपाटीला गेलेली जनावरं उरलं-उरलं सुरलं गवत खाऊन जगत होते. तर, गावोगावी माणसांची दहान टँकरला टांगली गेली होती. मात्र आता, सुट्टीवरचा पाऊस पुन्हा ड्युटीवर रुजू झालाय. सकाळपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी बांधव सुखावलेत. आज विदर्भातील काही भागांत तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत, कुठे जोरदार तर कुठे पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवाय पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच सातारा या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. ऑगस्ट कोरडा गेल्यामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढली होती. मात्र कृष्ण जन्माच्या मुहुर्तावर पावसाने जलाभिषेक केल्यामुळे, महाराष्ट्र काहीसा सुखावलाय.