Maharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामने
विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतल्या पक्षांची महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. पण त्याचवेळी मविआत विधानसभेतल्या पराभवाच्या कारणांवरून ठिणगी पडलीय. विधानसभेत मविआकडून जागावाटपात बाराच घोळ झाला होता. त्या विषयाला काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा फोडणी दिलीय. जागावाटपाच्या विलंबाचं खापर त्यांनूी संजय राऊत आणि नाना पटोलेंवर फोडलंय. त्यावरून संजय राऊतांनी काँग्रेसवरच पलटवार केलाय. काँग्रेसनं जास्त जागा घेतल्या पण कमी जिंकल्या, त्या जागा शिवसेनेसाठी सोडायला हव्या होत्या, असं राऊतांनी म्हटलंय.
मविआतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर मविआची बैठक झाली नाही. पालिका निवणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे पवार नाराज असल्याचं समजतंय.उद्धव ठाकरे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करतायत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगलाय. त्यामुळे मविआत बिनसल्याचं चित्र आहे. मविआत समन्वय वाढायला हवा यासाठी पवार आग्रही आहेत, पण ते होत नसल्याचं ते नाराज झाल्याचं समजतंय.