Maharashtra MLCElection:अकोल्यातील बाजीगर,तीनवेळा जिंकलेल्या बाजोरियांना भाजपचे खंडेलवाल यांनी हरवलं
Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषद निवडणुकांच्या दोन जांगांचे निकाल हाती आले. निकालांमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरि यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत.
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत होती. बाजोरिया यांच्या रुपाने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे पर्यायाने खंडेलवाल यांच्यापुढे होतं. आतापर्यंत बाजोरियांच्या सोबतीला असलेले खंडेलवाल विधान परिषद निवडणुकीत मात्र तगड्या प्रतिस्पर्ध्याच्या रुपात बाजोरियांना भिडताना दिसले.
अकोला-बुलढाणा-वाशिम या तिन्ही ठिकाणी खंडेलवाल आणि बाजोरिया दोघांचाही दांडगा जनसंपर्क संपर्क होता. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे जरी शिवसेनेचे असले तरी आतापर्यंत गोपीकिशन बाजोरिया यांनी केलेल्या काही चुका आणि मतदारांमध्ये असलेली नाराजी हे या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत. दुसरीकडे वसंत खंडेलवाल हे जरी सराफा व्यापारी असले तरी पूर्वीपासून संघ परिवाराशी जोडले गेलेले आहेत. खंडेलवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात.