Maharashtra Drought : दुष्काळाची होरपळ,पाण्यासाठी तळमळ; महाराष्ट्रातील दुष्काळाचं भयाण चित्र
महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झालेयत. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहव करावे लागताय. उसणवाऱ्या करून, कर्जकज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत माना टाकल्या आहेत. तर गावागावांमधील रस्त्यांवर बाया-बाप्ये, कच्चे-बच्चे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी धावताना दिसतायत. गावात टँकर आला रे आला की ग्रामस्थांची त्याच्याभोवती मुरंकड पडतीय. तर ज्याच्या भरवशावर गावांची तहान अवलंबून आहे, त्या धरणांचा तळ आता उघडा पडलाय. कधीकाळी पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या जलाशयांमध्ये आता फक्त दिसतायत खडक आणि चिखल...
धारशिव जिल्ह्यात एकीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला तर, दुसरीकडे धाराशिव शहरामध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागतेय. एका खांद्यावर हंडे, कळशा आणि दुसऱ्या खांद्यावर लहानग्या बाळांना घेऊन घराबाहेर पडायचं आणि जिथं पाणी मिळेल तिथून पाणी आणायचं... तर कधी रात्री-अपरात्री सायकली घेऊन पाण्यासाठी रात्रभर भटकायचं, पाणि मिळालं की पहाटे घरी परतायचं... आणि दिवसभराची तहान भागवायची. हा आता रोजचा दिनक्रमच बनून गेलाय. तळ गाठलेली मडकी आणि त्यात पाण्याऐवजी साचलेला कचरा... अशी भयाण परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांत निर्माण झालीय.
जिथं माणसांना प्यायला पाणी मिळेना, तर शेतीतील बागांना ओलावा कुठून मिळणार? असं मोठं प्रश्नचिन्ह हिंगोलीतल्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालंय. हिंगोलीच्या असोला गावातील शेतकरी बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडील विहिरीच्या भरवशावर दोन एकर केळीची लागवड केली. मात्र विहिरीने तळ गाठला आणि पाण्याची समस्या निर्माण झालीय. पुरेसं पाणीच मिळत नसल्याने आणि अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे केळीची पानं सुकलीयत. तर पपईच्या बागेतील सुकलेल्या झाडाला लगडलेल्या पपई पिवळ्या पडून करपत चालल्या आहेत.