Maharashtra Board Exams 2021 : दहावीच्या परीक्षा रद्द, पण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार?

Continues below advertisement

मुंबई : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कोणत्या आधारावर केलं जाणार, याबाबतीत विद्यार्थी आणि पालक यांच्यात कमालीची उत्सुकता आणि तेवढाच संभ्रमही पाहायला मिळत आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या आधारावर देण्यात येणार? याबाबतीतही अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचा पर्याय असून शिक्षण विभाग त्यावर चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पास करुन पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यानंतर नववीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते. तसेच याव्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकनही होत असतं. याआधारावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा पार पडत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचंच असतं. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे, हा प्रश्न कायम आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये मार्कांवर स्पर्धा असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मार्क कशाच्या आधारावर द्यायचे? असा मोठा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी एक परीक्षा घेता येईल का? या पर्यायाची चाचपणी सुरु आहे. जर अशी परीक्षा झाली तर कशा पद्धतीनं होणं अपेक्षित आहे? तसेच यासाठी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? या पर्यायांवर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहेत. आपली मूल्यांकन पद्धत इतर बोर्डांसारखी नसल्यामुळे नेमकं काय करता येईल, यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरु आहे. 

दरम्यान, आज शिक्षण विभागाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील सर्व संभ्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षण विभाग काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram