Maharashtra Assembly Brawl | विधानभवनात राडा, महाराष्ट्राची बदनामी!
काल विधानभवनात झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राची देशाबाहेर बदनामी झाल्याची टीका केली. कार्यकर्त्यांना भवनामध्ये आणण्याबाबत नेत्यांनी निर्णय घ्यावा असे अजित पवार यांनी सांगितले. कालच्या घटनेसंदर्भात दुपारी दीड वाजता विधानसभा अध्यक्ष घोषणा करणार आहेत. एका नेत्याने सांगितले की, 'काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रीमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती. हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे.' या घटनेबाबत मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. कडक कारवाई व्हावी अशी सर्वांचीच भावना आहे. विधान भवन हे कायदेमंडळ असून, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम येथून होते. त्यामुळे या पवित्र वास्तूचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कालची घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आणि कडक कारवाईची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि गोपीचंद पटळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात हाणामारी झाली होती. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही या महत्त्वाच्या मुद्यांवर प्रश्न निर्माण झाले आहेत.