Manikrao Kokate | चौकशीत दोषी आढळलो तर एका सेकंदात राजीनामा देईन, कोकाटेंचं वक्तव्य; चौकशीची मागणी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव वाढला होता. मात्र, आपण काहीच चुकीचं केलं नसल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, आपण रमी खेळतच नव्हतो, तो गेम मोबाईलवर वारंवार येत होता आणि आपण तो स्कीप करत होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना लेखी पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकाटे यांनी म्हटले आहे की, चौकशीमध्ये दोषी आढळल्यास राजीनामा देईन. अन्यथा, ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, त्यांना कोर्टात खेचून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार. त्यांनी प्रश्न विचारला की, "मी काय कोणाचा विधेयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी का पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे काय झालंय काय असं?" त्यांनी पुढे म्हटले, "जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाने न थांबता मंत्री आणि उ-उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करीन."