Mahad Flood: सावित्री नदी धोका पातळीवर, NDRF टीम दाखल
महाडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. महाड तालुक्यात सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. खबरदारी म्हणून सावित्री नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगडमधील आंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्याला सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. सावित्री नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. दादली पुलाच्या कडेला पाणी लागले असून नदी जोरदार वेगात वाहत आहे. महाबळेश्वरच्या वरच्या खोऱ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सावित्री नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 'सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली आहे', अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. २०१९ आणि २०२१ च्या महापुरात सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले होते. यंदाही पावसाचे प्रमाण वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाडमध्ये NDRF टीम देखील दाखल झाली आहे. सावित्री नदीच्या पाण्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.