lockdown in Solapur city : सोलापूरात शहरात निर्बंध जैसे थेच, व्यापारी संतप्त
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये काही शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केवळ शासकीय नियमामुळे सोलापूर शहराला लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही. सोलापूर शहरातील कोरोना स्थिती आटोक्यात जरी असली तरी 2010 च्या जनगणनानुसार शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी असल्याने ग्रामीण भागासाठी लागू करण्यात आलेले आदेशच शहरासाठी लागू असणार आहेत. त्यामुळे 15 जून पर्यंत जैसे थे परिस्थिती असणार आहे.
सोलापुरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत तर विना अत्यावश्यक सेवांना कोणतीही परवानगी नाही आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या आदेशाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खलबतं सुरू होती. मात्र अखेर नियमानुसार कोणताही दिलासा देत नसल्याने रात्री उशिरा 12.30 वाजता आधीचेच आदेश लागू करण्यात असल्याची माहिती पालिका उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली. तसेच शासनाच्या लोकसंख्या निकषाप्रमाणे निर्बंधात सवलत देण्यासाठी सोलापूर महानगरपालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक नसल्याने जिल्ह्याचे आदेश शहरात तसेच लागू करण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रियाही पालिका उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली.
दरम्यान ग्रामीण भागात मागील 10 दिवसांपासून बंद असलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू करता येणार आहेत. तर शहरात दुचाकीवरून केवळ एकाला प्रवास करण्याची मुभा होती ती अट शिथिल करण्यात आली असून, आता दोघांना प्रवास करता येणार आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात परिस्थिती आटोक्यात असताना कोणतीही सवलत न दिल्याने व्यापारी वर्गातून आदेशाला विरोध होण्याची शक्यता आहे.
राज्यात 2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात आले आहे. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक असल्याने सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्ह्यासाठी एकच निर्णय लागू करण्यात आला आहे.