Coronavirus Effect | आषाढी यात्रेवर अनिश्चिततेचे सावट, वारीसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी
चैत्रवारीपासून माऊलींच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरु होते. पण यावर्षी ते सगळं ठप्प आहे. महाराष्ट्रभरातून येणारे दिंडी प्रमुख, वारकरी यांच्या मनात आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी होते आहे. यावर्षी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थानाची तारीख 27 मे आहे. देहूमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 12 जून आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 13 जून आहे. त्यामुळे अगदी तोंडावर आलेल्या या उत्सवाची रुपरेषा ठरवण्यासाठी सरकारने पावलं उचलावित असं श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी म्हटलं आहे. देहूचे पालखी सोहळा प्रमुख असलेले अभिजीत मोरे यांनीही शासनाच्या निर्देशांवर उत्सवाचं स्वरुप अवलंबून असल्याचं सांगितलं.