Kolhapur : महापौर निवडणूण आणण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; Vinay Kore यांची कबुली
Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये माझ्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले असल्याची कबुली जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी दिली. कोल्हापूरमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विनय कोरे यांनी ही कबुली दिली.
आमदार विनय कोरे यांनी म्हटले की, काही वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले होते. माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुली कोरे यांनी दिली. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, असेही कोरे यांनी म्हटले.
विनय कोरे यांनी म्हटले की, बिनविरोध निवडणुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे नाही. मर्यादित मतदार असलेल्या निवडणुकांमध्ये समन्वयाची भूमिका घ्यायला हवी अशीही भूमिका त्यांनी मांडली. समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला असेही विनय कोरे यांनी म्हटले.