Kolhapur : किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे, जशास तसं उत्तर देण्याची राष्ट्रवादीची तयारी
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी आणि आणखी काही घोटाळ्यांची माहिती उघड करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला असतानाही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मात्र मुंबईत राज्य सरकारने केलेल्या कारवाईमुळे एकीकडे भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या कोल्हापूरला पोहोचले तर राष्ट्रवादी विरुद्ध किरीट सोमय्या हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापूर स्टेशनवर जमले आहेत. किरीट सोमय्या आणि भाजपला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करु असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे", "वेलकम किरीट सोमय्या", "बच्चा बच्चा जानता है, मुश्रीफ साहेब सच्चा है" अशी घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.