Kolhapur Ward : प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस-शिवसेनेत मतभेद
कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण ८१ नगरसेवक असतील. एकोणीस प्रभागांमधून प्रत्येकी चार तर शेवटच्या वीस क्रमांकाच्या प्रभागामधून पाच नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचनेला सामोरे जावे लागत आहे. या प्रारूप प्रभाग रचनेमुळे महाविकास आघाडीमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काँग्रेसने या रचनेला विरोध केला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाने या प्रभाग रचनेचे स्वागत केले आहे. काँग्रेसकडून सत्तेचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, प्रशासनाने महायुतीचा दबावाचा डाव उधळून लावला असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. ही प्रभाग रचना महाविकास आघाडीला फायदेशीर ठरेल आणि त्यांचे उमेदवार व महापौर निवडून येतील, असे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. भाजपने देखील या प्रारूप प्रभाग रचनेचे स्वागत केले आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची लवकरच एक संयुक्त बैठक होणार असून, त्यात काँग्रेसच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी काळात महाविकास आघाडी या प्रभाग रचनेचे स्वागत करेल, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.