Kirit Somaiya Uncut PC : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर ABP Majha
Kirit Somaiya Allegations on Hasan Mushrif : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं केलेल्या घोटाळ्याचा पाढा माध्यमांसमोर वाचणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं होतं. आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव जाहीर केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या डर्टी 11 संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. 2700 पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे."
"ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपनी आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय.", अशी माहितीही किरीट सोमय्यांनी दिली आहे.
"हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी यावेळी केला. सीआरएम सिस्टम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतल्याचं दिसून येत आहे.", असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केलंय.