Ekvira Devi Temple : कार्ल्याच्या एकविरा देवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी, कोरोना निर्बंधांचे तीनतेरा

पिंपरी-चिचंवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कुलदैवत म्हणजे पुण्यातील आई एकविरा देवी. याच एकविरा आईचं दर्शन घ्यायला भाविकांनी आज कार्ल्यात मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत झालेली भाविकांची पाहता ही गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देणारी नाही ना, असा प्रस्न पडला आहे. या गर्दीमुळेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देखील वाहनांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळत आहेत. शासनाच्या सर्व निर्बंधांना हरताळ फासलेला पाहायला मिळाला. कार्ल्यातील गर्दीला भाविक जितके जबाबदार आहेत तितकेच देवस्थान, पोलीस आणि प्रशासन देखील जबाबदार असल्याचं दिसून आलं.

कोरोनाने भारतात शिरकाव केल्यापासून मंदिरांची दारं भाविकांसाठी बंद झाली. त्यामुळे कार्ला गडावरील आई एकविरा देवीची गेल्या वर्षीची नवरात्र देखील बंद दाराआडच साजरी झाली. भाविकांना आपापल्या घरातूनच देवीला साकडं घालावं लागलं. यंदा ही तीच वेळ भाविकांवर येईल अशीच काहीशी परिस्थिती उद्भवलेली होती. पण जनतेने नियमांचे पालन केले अन कोरोना आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र निर्माण झालं. म्हणूनच महाविकासआघाडी सरकारने अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मंदिरं खुली करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त साधला अन् 7 ऑक्टोबरला भाविकांना मंदिरात प्रवेश मिळाला. भाविकांच्या भावनांचा आदर ठाकरे सरकारने राखला पण आता भाविक नियमांचं अनादर करताना दिसून येत आहेत. आजच्या कार्ला आणि मंदिर परिसरातील दृश्य ते अधोरेखित करीत होती. याला भाविकांसह देवस्थान, प्रशासन आणि पोलीस ही जबाबदार ठरले जात आहे.

सध्या नवरात्रोत्सव सुरु असून अशातच आज रविवार आल्याने भाविकांची गर्दी होणार हे स्वाभाविक होतं. त्याअनुषंगाने देवस्थान, पोलीस आणि प्रशासनाने उपाययोजना करणं अपेक्षित होतं. पण ही यंत्रणा हातावर हात ठेवून बसली होती. शनिवारी झालेला पाऊस आणि कोरोना यामुळे भाविक कार्ल्यात फिरकायचे नाहीत या गैरसमजात ते राहीले. पण त्यांचा हा गैरसमज होता हे रविवारची सकाळ उजडताच स्पष्ट झालं.

ठाकरे कुटुंबियांसह कोळी आणि आगरी समाजाची ही कुलदैवत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या समाजासह आसपासचा भाविक इथं येऊन पोहचला. कार्ला गडाच्या पायथ्याला उभं राहिलं तरी आपल्याला गर्दीचा अंदाज येतो. भाविकांची गर्दी एवढी आहे की अगदी मुंग्यांप्रमाणे भाविक गड चढत असल्याचं चित्र आहे. गडावर पोहचल्यावर तर काही बोलायची सोयच राहिली नाही. एकाच्या ही तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टनसिंगचा तर पद्धतशीरपणे बोजवारा उडवलेला पाहायला मिळाला.

मुख्यमंत्री ठाकरेंची कुलदैवता असणाऱ्या कार्ला गडावर कोरोना नियमांची अशी पायमल्ली होत असेल तर राज्यातील इतर ठिकाणी काय अवस्था असेल, हे नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे या नवरात्री होणाऱ्या गर्दीने जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिलं तर मंदिराची दारं पुन्हा बंद होणार हे निश्चित. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola