तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही; कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
अभिनेत्री कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागण्याची असल्याची टीकाही कंगना रनौतनं केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना कंगनानं पीओकेशी केली होती. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्षरित्या कंगनाला खडे बोल सुनावले होते. त्यावरून कंगनाने ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, ठाकरे कुटुंबिय, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी कंगनाच्या एका ट्वीटचाही उल्लेख केला ज्यामध्ये कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोणीतरी म्हणालं होतं की, मुंबई पीओके प्रमाणे आहे. ही लोकं मुंबईत काम करण्यासाठी येतात आणि पुन्हा शहराचं नाव खराब करतात.'