Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत
Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत
मविआ सरकारच्या काळातील 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी नंतरच्या काळात 'तेरी भी चूप, मेरी भी चूप', असे धोरण अंगिकारले होते. या प्रकरणात मी कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही. साक्षी आणि पुरावे असूनही ते दिले गेले नाहीत. ते पुरावे मिळाले असते तर पुढे काहीतरी घडले असते. माझ्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. ठाण्याचे एक डीसीपी सातत्याने या सगळ्यात हस्तक्षेप करत होते. कोण कोणाला वाचवतंय किंवा अडचणीत आणू इच्छित आहे, हे कळायला मार्ग नव्हता, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चांदीवार यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या. या मुलाखतीमध्ये निवृ्त्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सचिन वाझे यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सचिन वाझे यांनी शपथपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे पुरावे सादर केले असते तर अनेक बाबींचा उलगडा झाला असता. सचिन वाझे यांनी आपल्या शपथपत्रात अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव घेतले होते. पण मी वाझेंना सांगितले होते की, मी हे रेकॉर्डवर घेणार नाही. तुम्ही प्रतिज्ञापत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचा उल्लेख केला असला तरी मी त्यांना चौकशीसाठी समन्स काढणार नाही. सचिन वाझे हे याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांनाही मी फडणवीसांचे नाव रेकॉर्डवर घेणार नाही, असे सांगितले. मोठी नावं घेतली की प्रसिद्धी मिळते, प्रसारमाध्यमांवर त्याची चर्चा होते. मला हे टाळायचे होते, असे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले. सचिन वाझे यांनी शपथपत्रात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींवरुन नंतर घुमजाव केले. त्यावेळी ठाण्याचे एक डीसीपी चौकशीत सतत हस्तक्षेप करायचे. त्यावेळी मला माहिती न देता परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची मिटिंग झाली होती. याप्रकरणाची चौकशी होऊन या दोघांना आणण्यासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचीही भेट झाल्याचे मला समजले. मला निरपेक्ष बुद्धीने चौकशी करायची होती. राजकीय साठमारीसाठी अनेक गोष्टी होतात. सचिन वाझे यांनी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, सचिनजी कुठेतरी थांबा. कोणाला आयुष्यातून उठवण्याचा काम करु नका, असे मी वााझेंना सांगितल्याचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले. माझ्या अहवालातील बाबी शासनाच्या पचनी पडणाऱ्या नव्हत्या. त्यामध्ये अनेक विस्फोटक गोष्टी होत्या, असेही निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले.