Jaydeep Apte Special Report : आरोपींना राजाश्रय? विरोधकांचा सवाल
Jaydeep Apte Special Report : आरोपींना राजाश्रय? विरोधकांचा सवाल
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर गायब असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण आता जयदीप आपटे (Jaydeep Apte) याच्याविरोधात पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता. 26 ऑगस्टला शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा पडल्याची माहिती समोर आल्यानंतर जयदीप आणि त्याच्या पत्नीने घराला कुलूप लावून हे घर सोडले होते. यानंतर जयदीप आपटेची पत्नी माहेरी गेली होती. परंतु, जयदीप आपटे याचा नेमका ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांना आता जयदीप आपटेला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी वेगाने शोधमोहीम राबवण्याचे ठरवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस जयदीप आपटे याचा शोध घेत आहेत. मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्याविरूद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. परंतु अजूनही जयदीप आपटे अद्याप सापडलेला नाही. तर दुसरीकडे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील (Chetan Patil) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. तो सध्या 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. परंतु जयदीप आपटे फरार आहे.