Jayant Patil ED Office : कार मागेच थांबवली, पोलिसांसह जयंत पाटील चालतच ईडी कार्यालयात दाखल
Jayant Patil ED : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशी केली जाणार आहे. IL & FS प्रकरणी ईडीकडून जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील राष्ट्रवादीकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात येत असून, पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
IL & FS प्रकरणी ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार आज जयंत पाटील यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. मात्र जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप करत राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात देखील राष्ट्रवादीकडून असेच आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी ईडी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे. तर 'सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है' अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. तसेच 'जवाब दो मोदी सरकार जवाब दो' असे फलक आंदोलनाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.