Jal Jeevan Mission Dues | हजारो कोटींची थकबाकी, कंत्राटदारांच्या अडचणी वाढल्या
राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. केंद्राने सर्व राज्यांना 'केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी' असे पत्र दिले आहे. मात्र, 'केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही' असे सांगत वित्त विभागाने जल जीवन मिशनच्या थकबाकीची फाईल माघारी पाठवली आहे. त्यामुळे केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही लवकर मदतीची आशा मावळली आहे. महाराष्ट्रातील जल जीवन मिशनच्या कामाचे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यात नुकतीच जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.