Maharashtra : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या मराठी माणसांच्या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रगीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अमलात येईल. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावं असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली. सांस्कृतिक कार्य विभागाकडून महाराष्ट्रभूषण या राज्यातल्या सर्वोच्च पुरस्कारासाठीच्या इनामाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. ही रक्कम १० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे.