Literary Conference : ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येकाकांच्या संकल्पनेतलं ‘असेही एक साहित्य संमेलन’
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये उर्फ मुळ्येकाकांच्या संकल्पनेतून नुकतंच ‘असेही एक साहित्य संमेलन’ पार पडलं. अनुवादक तसंच शब्दांकनकारांच्या योगदानाला वंदन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं. गेली अनेक वर्षे ‘उत्तम अनुवाद ’ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांमधील अनुवादित साहित्याला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे संपादक ‘अभिषेक जाखडे’ यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. शब्दांकनकार प्रा. नितीन आरेकर यांचाही प्रातिनिधिक सत्कार या कार्यक्रमात झाला. तसंच शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करणारे वृत्तपत्र ‘दैनिक नवाकाळ’चा खास सन्मान या संमेलनात करण्यात आला. दैनिक नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर-पांडे यांनी हा सन्मान स्वीकारला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते.