Illegal Conversion Racket : बीडमधील इरफान शेखला UPATS कडून अटक

Continues below advertisement

बीड : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीत धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्याचा असल्याचं समजत आहे. त्याचसोबतच इरफान शेख केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला होता. त्यावेळी, जवळपास एक हजार लोकांचे धर्मांतरण करण्यात आलं असल्याचंही प्रशांत कुमार यांनी सांगितलं होतं. याप्रकरणी दिल्लीतून आरोपींना अटक करण्यात आली होती. 

धर्मांतर करणाऱ्या या मोठ्या रॅकेटमधील मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता या प्रकरणी केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयात काम करणाऱ्या इरफान शेखलाही अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत हा तरुण मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लाच देऊन त्यांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरणही समोर आले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास असून तो दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयामध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवाशी आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. 

एबीपी माझानं इरफान शेखच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाईकांनी ही बाब धक्कादायक असून इरफान असं करु शकत नाही, असं सांगितलं. तसेच अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयाच्या कार्यक्रमास आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी शिरसाळा गावचा भूमी पूत्र माझा लहान भाऊ प्राध्यापक इरफान खाजा खान पठान यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपिठावर स्वतः नरेंद्र मोदी यांनी कौतूक केलं होतं. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे इरफान असं करू शकत नाही, असं त्याच्या मामांना वाटत असून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतरच या प्रकरणी बोलू असं त्यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram