Husband Build Wife Temple : पत्नीने सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडला, पतीनं मंदिर उभारलं
पत्नीने सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडल्यावर पतीला धक्का बसला आणि पत्नीची सदैव आठवण राहावी यासाठी बेळगावात एकाने आपल्या पत्नीचे मंदिर उभारले आहे. बेळगाव येथील गँगवाडी येथील माजी नगरसेविका मैनाबाई चौगुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पत्नीच्या अकाली निधनाचा पती शिवा चौगुले याना धक्का बसला.पत्नीची तीस वर्षे साथ मिळाल्या नंतर अचानक तिचे निधन झाल्यामुळे शिवा चौगुले यांनी एकाकी पडल्यासारखे झाले. मैनाबाई चौगुले यांचे माहेर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले हे गाव.विवाह झाल्यानंतर त्या बेळगावला आल्या.पती शिवा चौगुले हे समाजसेवक आणि गोरगरिबांना नेहमी मदत करणारे व्यक्तिमत्व.त्यामुळे मैनाबाई यांना त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहायला लावले.निवडणुकीत त्या निवडून आल्या.नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे राबवून जनतेची मने जिंकली.अनेक मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देखील कोणताही गाजावाजा न करता केली.त्यामुळे मैनाबाई यांचे अकाली निधन केवळ घराच्या मंडळींना नव्हे तर प्रभागातील जनतेला देखील चुटपुट लावून गेले.पत्नीचा सदैव आपल्या समवेत सहवास रहावा म्हणून शिवा चौगुले यांनी आपल्या पत्नीची मूर्ती करून मंदिर उभारण्याचे ठरवले.बेळगावातील मुर्तीकाराने तयार केलेली मूर्ती वाजतगाजत आणली.घरात मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली.दररोज सकाळी मूर्तीची पूजा करून हार घालून तिची आरती शिवा करतात.सायंकाळी देखील दिवाबत्ती करून आरती करण्यात येते.गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून मैनाबाई चौगुले सदैव प्रयत्नशील होत्या.त्यांचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवा चौगुले यांनी हॉस्पिटल आणि शाळा भविष्यात सुरू करण्याची योजना आखली आहे.