Solapur कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोशल डिस्टसिंगचा फज्जा, गर्दीत कोरोना वाढण्याची भिती ABP Majha
सोलापूर : राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध जरी शिथिल झाले असले तरी 11 जिल्ह्यातील निर्बंध हे कायम आहेत. सोलापूर जिल्ह्यात शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरणारी आहे. ग्रामीण भागात दररोज सरासरी 400 ते 500 रुग्ण आढळत आहेत. तर ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी रेट हा सरासरी 5 ते साडे पाच टक्के इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हाचा समावेश अद्यापही तिसऱ्या टप्प्यात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीयेत. परिणामी रुग्णसंख्या वाढतेय. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी कोरोनाविषयक नियमांचा पुन्हा एकदा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. बाजार समिती जरी शहरात असली तरी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच भागातून नागरिक येत असतात. अशा ठिकाणी नियमांचं पालन झालं नाही तर परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.