Gadchiroli : नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या पोलिसांचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून कौतुक
गडचिरोली : काल झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान 29 अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, 26 नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आले. दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.
मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा
दरम्यान या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.