Heavy Rain | कोकणात पावसाचा हाहाकार, Raigad मध्ये नद्यांना पूर, Sindhudurg मध्ये युवक वाहून गेला!
कोकण विभागात पावसाचा जोर वाढला आहे. रायगड जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यात सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीला मोठा फटका बसला आहे. काही भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकिनारी असणाऱ्या नागरी वस्त्यांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. रायगडमध्ये अनेक भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील सुटीवली खिंडीमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव येथील एक युवक ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. गेल्या चोवीस तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहात्तर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक शंभर तेवीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.