Gharkul Scheme Bhandara : धक्कादायक! 'घरकुल'ला वैतागून भंडाऱ्यात जीवन संपवण्याचा प्रयत्न
स्वतःच हक्काचं घर असावं हे सगळ्यांचच स्वप्न असतं. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या राज्यात घरकुल योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना कुठे लाच द्यावी लागते, तर कुठे आत्महत्या करावी लागते, असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव या गावातील तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या नावाने घरकुल मंजूर झाले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्यानं त्यांच्या नावाचे घरकुल स्वतःच्या नावाने करावे अशी मागणी तक्रारदाराने ग्रामपंचायतकडे केली. यासाठी ग्रामसेवकाने सात हजारांची लाच मागितली. सात हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक धनंजय लांजेवार आणि शिपाई लालचंद चकोले यांना अटक करण्यात आलीये.. तर तिकडे चंद्रपुरात पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलाचे अर्धे बांधकाम करण्यात आले. घरकुलाचा धनादेश मिळविण्यासाठी वारंवार चकरा मारूनही तो न मिळाल्याने सोनेगाव-बेगडे येथील सुधाकर नन्नावरे यांनी पिकावरील फवारणीचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे या घटनांकडे सरकारनं तातडीनं यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करण्यात येतेय.