High Tide | गणपतीपुळे समुद्रात जाऊ नका, भाविकांना आवाहन, जीवरक्षक तैनात
गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या पावसाळा असल्याने समुद्राला उधाण आले आहे. यामुळे खबरदारी म्हणून भाविकांनी समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी जीवरक्षक आणि पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर लागूनच असलेल्या बीचवरही भाविकांची मोठी गर्दी होती. समुद्राला उधाण असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे भाविकांनी किंवा पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करणारे बोर्ड लावण्यात आले आहेत. पोलीस नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. कोणतीही दुर्घटना घडल्यास जीवरक्षकांची मदत होते. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरू असतानाही विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.