UGC चे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांचं निधन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम
मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नॅकचे संस्थापक डॉक्टर अरुण निगवेकर यांचे पुण्यात निधन झाले आहे. 79 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगामुळे आजारी होते. भौतिकशास्त्र (फिजीक्स) विषयातील शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर डॉक्टर निगवेकर यांनी काही वर्षं स्विडनमधे काम केलं. त्यानंतर ते भारतात परतले आणि भारतातील शिक्षण पद्धती आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशातील शिक्षण पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.