Eknath Gaikwad Passes Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन

Continues below advertisement

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. 

माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी राजकीय वर्तुळत त्यांची ओळख होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेसची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. काँग्रेसला महाराष्ट्रात पुढे नेण्याच्या कामात त्यांचा मोलाचा हातभार लागला होता. मुंबईमध्ये त्यांच्या नावाला असणारं वजन पाहता, मुंबई प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. 

सध्याच्या घडीला रुग्णालयामध्येच एकनाथ गायकवाड यांचं पूर्ण कुटुंब असून, दुपारनंतर त्यांच्या कुटुंबाकडे पार्थिव सुपूर्द करण्यात येणार असल्याचं कळत आहे. ज्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. थोड्याच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही रुग्णलायात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पोहोचणार असल्याचं कळत आहे. 

राज्याचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर 'एबीपी माझा'शी संवाद साधत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'मागील 20- 25 वर्षे आम्ही युवा नेते त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते या नजरेतून पाहत होतो, त्यांच्या जाण्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांना सोबत नेऊन जाणारं एक नेतृत्त्वं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आजारपणावर मात करुन ते पुन्हा रुग्णालयातून बाहेर येतील पण, असं काही झालं नाही', असं म्हणत पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं. राजकीय कारकिर्दीत कष्ट करण्याती तयारी, एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेसाठीचा अट्टहास अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्याजोग्या असल्याचं ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram