Sudhakar Pant Paricharak | ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज (18 ऑगस्ट) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे.
कोरोनाचा फैलाव पंढरपूर परिसरात वाढल्यावर 5 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.