Exclusive : पोलिसांच्या बदल्यांमागील गौडबंगाल काय? एबीपी माझाच्या हाती तो गोपनीय अहवाल
मुंबई : राज्यात पोलिसांच्या बदल्यांमध्ये किती भ्रष्ट्राचार आहे, हे उघड करणारा गोपनिय अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्या अहवालातील एजंट्सची नावंही समोर आली आहेत. तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगद्वारे राज्यातील पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. यासंदर्भातील अहवाल त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला होता. या अहवालात जवळपास अर्धा डझन एजंट्स आणि चाळीस एक अधिकाऱ्यांची नावं आहेत. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट चालवणाऱ्या दलालांनी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यासंदर्भाती यादीच या अहवालात आहे.
रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. हाच अहवाल देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली असून यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.