Eknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहन
Eknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहन
Eknath Shinde मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार आहेत. तर नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा मुख्यमंत्री व्हावे,अशी शिवसेनेच्या आमदारांची, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून वर्षा या निवासस्थानी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.