Bharat Gogawale : एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बोलावलं पण तरी गोगावले रायगडमध्येच, कारण काय?

मुंबई: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छूक असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी तब्बल अर्धा तास वन टू वन चर्चा केली. त्यानंतर दुपारी एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांना महाडवरुन मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता मुंबईत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णायक चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमित शाह यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावरुन निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि अमित शाह यांच्यात काल रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. त्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी अमित शाह यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांना कोणता मेसेज दिला असावा का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता भरत गोगावले मुंबईत आल्यानंतर काय घडणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. भरत गोगावले यांना याविषयी विचारले असता त्यांनी आपण मुंबईला पक्षाच्या कामासाठी चाललो, असल्याचे सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola