Eknath Khadse : महत्वाचे प्रश्न एका बाजूला राहिले, दुर्दैवानं पूर्ण अधिवेशन वाया गेलं
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत एकनाथ खडसे हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे संतापले. तेव्हा सभापती राम शिंदे यांनी मंत्री शंभुराज देसाई हे सभागृहात येत आहेत, ते वाटेतच आहेत, असे सांगत खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) धावतपळत विधानपरिषदेत आले, त्यावेळी खडसे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.
आपण अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करत आहोत. अशा महत्त्वाच्या वेळी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसणे, यावरुन सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसते. शंभुराज देसाई सभागृहात धावतपळत आले. मंत्रिमंडळात 42 जण आहेत. मात्र, तुम्ही एकटेच सभागृहात उपस्थित आहात, याबद्दल अभिनंदन. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेसाठी सभागृहात काही मंत्र्यांनी उपस्थित राहावे, ही अपेक्षा असते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.