Money Laundering Case: Anil Deshmukh यांना मोठा धक्का, PA कुंदन शिंदे, PS संजीव पालांडे यांना अटक

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

दरम्यान ईडीने काल (25 जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील  जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले. 

या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले की, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. सत्य समोर येईल, अशी आशा आहे. भविष्यातही तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू असंही देशमुख यांनी सांगितलं. देशमुख म्हणाले की, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram