Nagpur Ganpati : 'सप्त मृत्तिका'मातीची खास गणपतीची मूर्ती
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, प्रत्येक गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळ पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी प्रयत्नशील आहे. नागपूरचे मूर्तीकार सुरेश पाठक यांनी 'सप्तमृत्तिका' नावाची खास मातीची गणपती मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीला कोणतेही कृत्रिम किंवा नैसर्गिक रंग लावण्याची आवश्यकता नाही. सुरेश पाठक यांनी तयार केलेली ही सप्तमृत्तिका मूर्ती सात वेगवेगळ्या रंगांच्या मातीपासून बनवली आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील आदाशी आणि छिंदवाडा येथील मातीचा वापर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील सावरगाव, यवतमाळ आणि आंधळगाव येथील मातीचा समावेश आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील आझमगड येथील मातीचाही वापर या मूर्तीसाठी करण्यात आला आहे. "सात वेगवेगळ्या रंगांच्या मातीचा वापर करून नैसर्गिकरित्या रंगीत मूर्ती तयार करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे," असे या मूर्तीकारांनी म्हटले आहे. ही मूर्ती निसर्गाचे जतन करणारी असून, गणेशोत्सवासाठी एक आदर्श पर्याय ठरत आहे.