Dombivli Blast Update : आठ जणांचा मृत्यू, 60 जण जखमी; सध्या परिस्थिती कशी?
डोंबिवली एमआयडीसीमधल्या अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळं संपूर्ण डोंबिवली हादरली. एमआयडीसीपासून केवळ दीड-दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे फुटले, घरांच्या भिंतींना तडे गेले. या सर्व प्रकारामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
डोंबिवलीत केमिकल्स कंपनीत झालेला स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा समोर आला आहे. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत बॉयलररसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. या कंपनीत कोणतीही परवानगी घेतलेला अधिकृत बॉयलर नव्हता. त्यामुळे अनाधिकृत बॉयलर कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता असा सवाल उपस्थित होत आहे.
गुरूवारी दुपारी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीचा लोळ मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. तसेच आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही ही आग पसरली. या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण यामध्ये जखमी झालेले आहेत.
डोंबिवलीतील या कंपनीमध्ये झालेला स्फोट हा इतका भयंकर होता की त्याचा आवाज तीन ते चार किमीपर्यंत पोहोचला. तसेच या स्फोटामुळे जवळपास दीड किमी परिसरातील सोसायट्यांच्या खिडक्या फुटल्याचं दिसून आलं. या स्फोटामधील बॉयलरचे तुकडे हे दीड-दोन किमीपर्यंत उडून गेले.