Disha Salian Special Report | पोलिसांचे प्रतिज्ञापत्र, दिशा सॅलेन प्रकरणी नवा ट्विस्ट, राजकारण तापले!
या अधिवेशनात दिशा सॅलेन मृत्यु प्रकरण पुन्हा चर्चेत आले. मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे आमदार आदित्य ठाकरेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या प्रतिज्ञापत्रात घातपात, हत्या आणि बलात्काराचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद केले आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, त्यात कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही असे म्हटले आहे. मात्र, दिशा सॅलेनच्या वडिलांनी या प्रतिज्ञापत्राला आक्षेप घेतला आहे. एसआयटी रिपोर्ट संदर्भातील प्रतिज्ञापत्र चुकीचे असल्याचा आरोप दिशाच्या वडिलांच्या वकीलाने केला आहे. या घडामोडींवरून राजकारण तापले आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. "सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणे आहेत ते एक मुलगं आहे का मंत्री? घोडं आहे का? काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यात. त्यांनी माफी मागायला पाहिजे नाक घासून," असे संजय राऊत म्हणाले. याउलट, नितेश राणे यांनी आपली भूमिका कायम ठेवत "पिक्चर अभी बाकी है" असा इशारा दिला. तत्कालीन ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले म्हणून दिशाच्या वडिलांची माफी मागावी अशी मागणी राम कदम आणि शिवसेनेच्या उदय सामंत यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या वर्तणुकीची हमी दिली. "मला अतिशय समाधान आहे की पोलिसांनी योग्य ती भूमिका मांडली आणि तो अॅक्सिडेंट होता आणि ती हत्या नव्हती हे पोलिसांनी स्पष्टपणानं सांगितलं. मुळातच आदित्य ठाकरे त्या प्रवृत्तीचे नाहीत," असे जयंत पाटील म्हणाले. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. "सत्य बाहेर येऊन दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, खरंच कोणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा मिळावी. फक्त राजकीय कुरघोड्यांसाठी या गंभीर घटनेचा उपयोग होऊ नये," असे आदित्य ठाकरे म्हणाले. सीबीआय तपासासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सरकारने वेळ मागितला आहे.