Deepali Chavan Case : निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर
Deepali Chavan Suicide Case : निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. स्वत:विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा रेड्डी यांनी न्यायालयात केला.
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना केंद्रस्थानी ठेवत रेड्डींना अटकही करण्यात आली होती. पण, आता मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे एक चार पानी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले होते. याच पत्राच्या आधारे काही दिवसांपूर्वी अमरावती पोलिसांनी कारवाई करत रेड्डी यांना ताब्यात घेत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होतं. पण, अटकेच्या या कारवाईनंतर सदर घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद रेड्डींना मांडल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयानं सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे.