Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण करणार पांडुरंगाची पूजा?
कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार, हा प्रश्न विठ्ठल मंदिर समितीसमोर आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे विचारणा करणार आहे. "उपमुख्यमंत्री दोन पण पूजेचा मान करील कोण" अशी चर्चा पंढरीमध्ये सुरू आहे. दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. विधी व न्याय विभागाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निमंत्रण दिले जाईल. दोन हजार सतरा साली आचारसंहिता असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी पूजा केली होती. तसेच दोन हजार तेवीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा पार पडली होती. आचारसंहिता असली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येणार आहे. शासनाकडून ज्यांचे नाव निश्चित होईल, तेच उपमुख्यमंत्री यंदा कार्तिकीची महापूजा करतील.