Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अर्लटवर; मंत्री उदय सामंत यांची माहिती

Continues below advertisement

भारतीय हवामान खात्याकडून शुक्रवारी, लक्षद्वीप भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचं पुढील 24 तासांत चक्रीवादळात रुपांतर होणार असून, हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकणार असल्याचा इशारा दिला. 

सदर परिस्थिती पाहता हवामान खात्याकडून महाराष्ट्र, केरळ, गुजरात या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागांत वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार असून, वादळाची तीव्रता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणखी वाढण्याचं चित्र आहे. चक्रीवादळाच्या हा धोका पाहता मासेमार कोळी बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तोक्ते (Tauktae) असं नाव असणाऱ्या या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप बेटसमूह, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक (किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग), दक्षिण कोकण आणि गोवा, गुजरात या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्याने कोविड रुग्णालय किंवा ऑक्सिजन यंत्रणा सुसज्य रहावी यासाठी जनरेटर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरुन विद्युत पुरवठा खंडित न होता कोविड रुग्णांवर उपचार सुरु राहातील असं नियोजन केलं आहे. हे वादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर आल्यास वेंगुर्ले, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील 38 गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वादळाचा काळ तीन दिवसाचा आहे. त्यामुळे किनारपट्टीसह जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळं आवश्यक त्या सर्व किनारपट्टी भागांत एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. शिवाय कोणतंही संकट ओढावण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हे संकट थोपवून लावण्यासाठी सर्वतोपरी तयार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram