Congress Manifesto for Maharashtra Assembly Election: मायक्रो प्लॅनिंग! काँग्रेस तीन जाहीरनामे देणार
विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तीन पातळ्यांवर जाहीरनामा, राज्य, जिल्हा, मतदारसंघ पातळीवर तीन जाहीरनामे , मुस्लीम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष देणार , कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी
नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पहिल्यांदाच तीन पातळ्यांवर असणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर जाहीरनामा तयार केला जाईलच सोबतच प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याची मुभा दिली जाणार आहे. तशी माहिती काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी
एवढच नाही तर मुस्लिमांसाठीही या जाहीरनाम्यात विशेष लक्ष पुरवले जाणार आहे. मुस्लीमही या देशाचे नागरिक असून ते इथे जन्मले आहेत. म्हणून दुसऱ्यांचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार मुस्लिमांचाही आहे, असे नितीन राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या न्यायपत्रात (जाहीरनाम्यात) अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला होता. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर, पंतप्रधानांनी आमच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर टीका केली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही भारताचा नागरिक म्हणून मुस्लिमांची काळजी घेणार नाही. मुस्लीम बांधव या देशाचे नागरिक असून ते इथेच जन्मलेले आहेत. त्यांचाही या देशात अधिकार आहे. म्हणून आमच्या जाहीरनाम्यात त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे नितीन राऊत म्हणाले.