MPSC परीक्षांची तारीख उद्या जाहीर होईल, परीक्षा आठवड्याभरात होईल : CM Uddhav Thackeray UNCUT
मुंबई : काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं.
हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशीलरित्या हाताळावं अशी सूचनाही केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी 14 तारखेची परीक्षा पुढे ढकलत आहोत. मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण कोविडच आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. त्यांची चाचणी करणं गरजेचं आहे. ज्यांना लस दिली आहे, त्यांनाच इथे नेमलं जाईल. ही माझी सूचना आहे."