Babasaheb Purandare Passed Away : असा अलौकिक शिवआराधक होणे नाही : CM Uddhav Thackeray

Continues below advertisement

Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे. 

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहोचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहोचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram