CM Uddhav Thackeray Raju Shetti Meeting : आज 3 वाजता 'वर्षा'वर मुख्यमंत्री-राजू शेट्टी यांच्यात बैठक
कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल आता सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण आहे. आज 3 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहेत. राजू शेट्टी यांची पदयात्रा काल संध्याकाळी नृसिंहवाडी येथे पोहोचली. त्यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तेथे सरकारच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. कालपर्यंत साधा तलाठी भेटायला आला नाही. पण आज आंदोलनाचा अंदाज आल्यावर धावपळ सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. बैठकीत निर्णय झाला नाही तर रस्ते आडवावे लागतील. मंत्र्यांना गाव बंदी करावी लागेल. तरी देखील निर्णय घेतला नाही तर प्रत्येक गावातील नद्यांमध्ये जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.