CM Uddhav Thackeray हे तेलंगणाचे मुख्यमंत्री K. Chandrasekhar Rao यांची भेट घेणार :ABP Majha
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुहूर्त आता निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव यांना फोन केला होता. फोनवर झालेल्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. संजय राऊत यांच्या वादळी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना फोन लावल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. केसीआर हे लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहे. मोदी सरकारच्या व्यक्तीविरोधी धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केसीआर हे केंद्राविरोधात आंदोलन करणार आहेत. फोनवरील चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.