CM Thackeray | मी शांत, संयमी याचा अर्थ नामर्द नाही, अंगावर येणाऱ्यांची खिचडी शिजवू' : उद्धव ठाकरे
ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबं आहेत. मुलंबाळं आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.